लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता नव्याने विकास आराखडा तयार आला असून, याअंतर्गत स्वच्छतेसाठी पालिकेच्या दिमतीला कंत्राटी पद्धतीवर दहा स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले आहेत. तर आऊट सोर्सिंगद्वारे १८० कामगार नियुक्त करण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी सध्याच्या तुलनेत तीन पटीने अधिक साहित्य खरेदी केले जाणार आहे. आगामी मार्चपर्यंत स्वच्छ जालना सुंदर जालना ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येणार असून, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत.जालना शहर घाणीमुळे सर्वत्र पुरते बदनाम झाले आहे. तसेच दरवर्षी पालिका स्वच्छतेसाठी साहित्य खरेदी करते. पण दर्जा नसल्याने दोन ते चार महिन्यांतच साहित्य खराब झाल्याचा पूर्वानुभव आहे.गत २० वर्षांत शहराचा सर्वबाजूंनी विस्तार होत गेला. नवनवीन वसाहती निर्माण झाल्या. शहराची लोकसंख्याही ४ लाखांवर पोहोचली आहे. त्यातुलनेत पालिकेची स्वच्छता विभागाची यंत्रणा तोकडी पडत आहे. पालिकेच्या अनेक सभांमध्ये स्वच्छतेचा पंचनामाही सदस्यांनी केलेला आहे.केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान हाती घेतले असून, यासाठी देशभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरुआहेत. विविध माध्यमांतून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती केली जात असून, महापालिका, नगर पालिकांसाठी विशेष निधीही दिली जात आहे. याच अंतर्गत जालना पालिकेला १४ कोटी रुपयांचा मिळणार असून, पैकी काही निधी पालिकेला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संपूर्ण शहर व परिसर स्वच्छतेसाठी नव्याने विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिकारी, कर्मचाºयांची कंत्राटी पद्धतीवर भरती, स्वच्छतेचे विविध साहित्य या निधीतून खरेदी केले जाणार आहे. याची यादी तयार करण्यात आली असून, लवकरच घंटागाडी, ट्रॅक्टर, टिप्पर, हातगाडे आदी साहित्य लोकसंख्येच्या तुलनेत खरेदी केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कायमस्वरुपी कर्मचारी नेमून पालिकेवर आर्थिक टाकण्यापेक्षा आऊट सोर्सिंगवर पालिका प्रशासनाचा भर आहे.शहरातील गुरुदत्त लेबर सप्लायर्स या एजन्सीला कामगारांचे कंत्राट देण्यात आले आहे. जवळपास १८० कामगार स्वच्छतेच्या कामांसाठी नेमण्यात येणार आहेत. तर दहा स्वच्छता निरीक्षक कंत्राटी पद्धतीवर नेमले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१० नवे स्वच्छता निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:21 AM