जालना : परतूर रेल्वेस्थानकावर सध्या प्रवास्यांची प्रचंड गर्दी आहे. यातून वाट काढत रेल्वेत जाणे प्रवास्यांना जीवघेणे ठरत आहे. आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चढताना १० ते १२ प्रवासी पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली.
उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराई असल्याने सध्या परतुर रेल्वे स्थानकावर प्रवास्यांची प्रचंड गर्दी आहे. यामुळे दररोज रेल्वेत चढताना गोंधळ उडत आहे. यासोबतच आज बारावीची सीईटीची परीक्षा आहे. येथे येणाऱ्या रेल्वे आधीच प्रवास्यांनी भरून येतात. यामुळे हातात तिकीट असताना प्रवास्यांना गाडीमध्ये शिरता येत नाही अशी परिस्थिती आहे. यातच आज सकाळी ८ वाजता मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी प्रवास्यांनी प्रचंड गर्दी केली. गाडीत जाण्यास जागाच नसल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी गाडी निघताना कसेबसे मध्ये शिरणाच्या प्रयत्नात दहा ते बारा प्रवासी खाली पडून जखमी झाले. हे कळताच गाडी दोन वेळेस चैन ओढून थांबविण्यात आली. यात काही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक प्रवास्यांना प्रवास करता आला नाही. येथे येणाऱ्या प्रत्येक गाडीच्या वेळेस प्रवास्यांचा असाच गोंधळ उडत आहे. त्यामुळे रेल्वेची व डब्ब्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवास्यांमधून होत आहे.