जालना : एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीरित्या देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या दोघांना बदनापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. राहुल किसन वाडेकर (रा. ढोरपुरा रामनगर, जालना), मंगेश देविदास नाईक (रा. रामनगर पोलीस कॉलनी, जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २,४९,६०० रूपये किंमतीचे देशी दारूचे १०० बॉक्स व २ लाख रूपयांची गाडी असा ४,४९,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कायदा व सुव्यवस्था आणि अवैध वाहतूक रोखण्याच्या अनुषगांने सकाळी तीन ते पाच वाजेपर्यंत नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी बदनापूर पोलीस नाकाबंदी करीत होते. नाकाबंदी करीत असताना संशयित वाहन क्रमांक (एमएच.२०.ई.६७०१) हे जालन्याकडे येत होते. पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता, त्यात देशी दारूचे बॉक्स दिसून आले. चालकास पोलिसांनी कागदपत्राविषयी विचारणा केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यांना नावे विचारली असता, राहुल वाडकेर व मंगेश नाईक अशी सांगितली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २,४९, ६०० रूपये किमतीचे १०० देशी दारूचे बॉक्स व २ लाख रूपयांची गाडी असा ४,४९,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोघांविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि. एम.बी. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नित्यानंद उबाळे, सपोउपनि निवृत्ती शेळके, पोहेकॉ. बुनगे, होमगार्ड पवार, गाडेकर, शिंदे, नबी, चालक दुर्गश राठोड यांनी केली आहे.