लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : एका महिन्यात वॉटर ग्रीड योजनेतून शंभर गावांना शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. त्यानंतर ‘ब्लोअर’ मशीनची चाचणीही यावेळी घेण्यात आली.परतूर येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. लोणीकर म्हणाले, परतूर, मंठा तालुक्यांतील गावांसह इतर काही गावे मिळून पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून १७६ गावांसाठी शुध्द पाणी देणाऱ्या ‘वॉटर ग्रीड’ योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्य जलशुध्दीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाणी शुध्दीकरणासाठी लागणा-या (ब्लोअर) हवा निर्माण करणा-या मशीनची चाचणी नुकतीच घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. या योजनेचे काम महिनाभरात पूर्ण होऊन नागरिकांना शुध्द पाणी मिळेल. काही गावांनी ठरावांना संमती न दिल्याने त्या गावाचे काम रखडले होते. तसेच परतूर व मंठा अशा दोन तालुक्यांची योजना वेगळी करण्यात आली आहे. अनेक गावांत जलकुंभाची कामे सुरू आहेत. महिनाभरात ही कामे पूर्ण होऊन शुध्द पाणी मिळेल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटत आहे. मराठवाडा सातत्याने दुष्काळाला तोंड देत आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ग्रीड योजनेतून सुटेल. याच धर्तीवर शेतीसाठीही पाणी मिळाले पाहिजे, यासाठी धरणांचेही ग्रीड करून काही धरणे अंडरग्राउंड पाईप लाईनने जोडण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे.मराठवाड्यावर झाला अन्याय ...जायकवाडी धरणाच्यावर धरणे बांधून पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केला आहे. वर अनेक धरणे बांधल्याने जायकवाडी धरणात पाणी येत नाही. दुसरी बाब म्हणजे आपले पाणी तेलंगणात वाहून जाते. या पाण्याला अडवण्याचे काम विरोधी सरकारच्या काळात झाले नाही. आपल्या भागातील तेलंगणात जाणारे पाणी अडवले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. आज आपण पाणी अडवतो, जिरवतो; मात्र हे पाणी जास्त दिवस टिकत नाही.त्यामुळे कायमस्वरूपी पर्याय शोधणे गरजेचे आहे. आपली ही वॉटर ग्रीड योजना महराष्ट्र राज्यातील पहिली जंबो योजना आहे. आपण अहोरात्र काम करून, अभ्यास करून व माहिती घेऊन ही योजना पूर्णत्वास नेली आहे. निश्चितच ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास जात आहे. या योजनेतून सर्वांनाच शुध्द पाणी मिळेल, असा विश्वास शेवटी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शंभर गावांना मिळणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:16 AM