जालना जिल्हा हा गेल्या काही वर्षांपूर्वी शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील मुलींच्या प्रमाणात मागे पडला होता. त्यातच जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या उघड झाल्या. २०१५-२०१६ साली १ हजार मुलांमागे केवळ ८६६ मुली होत्या.
त्यानंतर जिल्ह्यात स्त्री जन्मदर वाढावा यासाठी विभागीय स्तरावर लेक वाचवा, राष्ट्र वाचवा अभियान राबवून मोठी जनजागृती केली होती. या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करून विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने प्रभावीपणे केली.
महिला बचतगटांच्या माध्यमातून स्त्री जन्माविषयी जनजागृती, प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीच्या जन्माचे स्वागत, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्त्व ग्रामसभेत सांगणे, सर्व शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये, सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना, माझी कन्या भाग्यश्री योजनेची यशस्वी अंमलबजावणी याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेला प्रभावी प्रचार आदी कारणांमुळे जिल्ह्यात मुलींची संख्या वाढण्यास मोठी मदत झाल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कडले यांनी सांगितले.
महिलांसाठी आरोग्यसेवा
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत महिला आरोग्य केंद्राला भेट देतात. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी जालना शहरातील शासकीय महिला रूग्णालयात पाठविले जाते. महिलांनाही गरोदरपणात तीन वेळा लसीकरण केले जाते.
मुलांचे लसीकरण
राष्ट्रीय कौटुंबिक अहवालानुसार, १२ ते २३ महिने वयोगटातील मुलांना आवश्यक असणारे लसीकरण पूर्णपणे दिले गेलेले आहे. त्याची टक्केवारी गत अहवालाच्या तुलनेत घटली आहे. मुलांना अंगणवाडीत हे लसीकरण करण्यात येत आहे.