जालना : आज सुरु झालेल्या दहावीच्या पहिल्या पेपरची प्रश्न पत्रिका व्हायरल झाल्याची चर्चा मंठा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर सुरु होती. याप्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एस. एम. चौधरी यांनी दिली.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १० वीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर सोशल मीडियावर पेपर सुरु होताच व्हायरल झाला. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत मराठी व हिंदीचा पेपर घेण्यात आला. दरम्यान, साडेअकरा वाजेच्या सुमारास मराठीचा पेपर सोशल मीडीयावर व्हायरल झाला. दरम्यान, जिल्ह्यातील ९७ केंद्रावर ही परीक्षा सुरु असून, ३१ हजार ५७२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
सखोल चौकशी करुमला एसएससी बोर्डाकडून माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. - एम. एस. चौधरी, शिक्षणाधिकारी माध्यमिक