लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर वाहतूक शाखेने गुरूवारी अचानक वाहन तपासणी तसेच रस्त्यात गाड्या उभ्या करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे अशा वाहनधारकांची अचानक तपासणी केली. त्यात जवळपास ११७ वाहनधारकांकडून एका दिवसात ४६ हजार रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली.दोन दिवसांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी दौरा करून पत्रकार परिषद घेतली होती. त्यात शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या मुद्यावर बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक एस.चैतन्य आणि अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी वाहतूक शाखेसह अन्य पोलीस दलातील विभागांना सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.गुरूवारी वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच शहरात विशेष मोहीम हाती घेतली. जी चारचाकी वाहने ऐन रस्त्यात उभी केली होती. त्यांना जामर लावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, नागरिकांनी वाहन चालविताना वाहनांची कागदपत्रे बाळगणे बंधन कारक असल्याचे काकडे म्हणाले.
११७ वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:25 AM