टेंभूर्णी : आज प्रत्येक जण शेती तोट्यात आहे, अशी ओरड करत असतो. मात्र, आधुनिक शेतीची कास धरल्यास कमी शेतीतही अधिक उत्पन्न मिळू शकते हे गणेशपूर येथील युवा शेतकरी गजानन अंधारे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी शेडनेटमध्ये घेतलेल्या सिमला मिरचीतून एका एकरमध्ये बारा लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.अंधारे यांच्याकडे वडिलोपार्जित साडेचार एकर शेती. या शेतीत मेहनत घेऊनही पारंपरिक पद्धतीने हवे तसे उत्पन्न मिळायचे नाही. त्यामुळे शेवटी ते सात वर्षांपासून शेड नेट शेतीकडे वळाले. शेतीच्या या आधुनिक प्रयोगाने अंधारे यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली.यासाठी केवळ दीड एकर शेतीचा वापर अंधारे करीत असून यात सिमला मिरची, टोमॅटो, कारले, काकडी, कलिंगड ही सीड्स पिके ते घेतात. या शेतीत गजानन अंधारे, त्यांच्या पत्नी संगीता अंधारे, मुले वैभव व अभिजित रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. यातून वर्षाकाठी खर्च वजा जाता बारा लाखांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.--------------पारंपरिक शेतीत मेहनत करूनही हाती काहीच यायचे नाही. शेवटी नेट शेतीकडे वळाल्याने उत्पन्नात भरघोस वाढ झाली. यासाठी माझा संपूर्ण परिवार परिश्रम घेत आहे. तरुण शेतक-यांनी निराश न होता नेट शेतीचा पर्याय स्वीकारावा. शासनाने शेड नेट साठी शंभर टक्के अनुदान दिल्यास अनेक शेतकरी इकडे वळतील. शेतकरी आत्महत्यांनाही आळा बसेल.गजानन अंधारे, शेतकरी, गणेशपूर.
दीड एकरात बारा लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:30 PM