लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नमुना नंबर ८ मध्ये नोंद करण्यासाठी जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील ग्रामसेविकेस १२ हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी पकडले. मंजूषा गोविंद जगधने (३२, रा. रामनगर पोलीस कॉलनी जालना) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. दरम्यान, मागील वीस दिवसांमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामसेवकांना लाच लूचपत विभागाने पकडले आहे.तक्रारदारानी जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथे १९२० चौरस फुटाची जागा नोटरी बॉण्ड रजिष्टरद्वारे खरेदी केलेली होती. सदर जागा नावे करण्यासाठी व नमूद जागेची ग्रामपंचायतला नोंद घेवून तसा नमुना नंबर ८ चा उतारा देण्यासाठी तक्रारदारांनी ग्रामसेविका जगधने यांच्याकडे कागदपत्रे देऊन त्यांना नमुना नंबर ८ मध्ये नोंद घेण्यासाठी विचारणा केली असता, त्यावेळी ग्रामसेविका जगधने यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लूचपत विभागाकडे केली. ८ मे रोजी ग्रामसेविका जगधने यांच्या राहत्या घरी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, ग्रामसेविका जगधने व खाजगी इसम कांता टोपे यांनी पंचासमक्ष तडजोडअंती १२ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक रविंद्र निकाळजे, पोनि. काशिद, पोनि. व्हि. एल. चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के राऊत यांनी केली.यापूर्वी दोघांना पकडले८ मे रोजी मंठा तालुक्यातील विडोळी बु व वाटुर तांडा येथील ग्रामसेवक भाऊसाहेब बबन वाल्हेकर, (८५) यांना ३ हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत विभागाने पकडले.२४ मे रोजी अंबड तालुक्यातील पावसे पांगरी येथील ग्रामसेविका मनिषा महापुरे यांना १० रुपयाची लाच स्वीकारताना पकडले होते. महिलाही लाच स्वीकारण्यास धजावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
१२ हजारांची लाच; ग्रामसेविकेस पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:47 AM