फोटो
अंबड : तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने अर्ज दाखल करून घेण्यासह इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १२५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषत: अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या अडचणी उमेदवार या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यादृष्टीने अधिकारी, कर्मचारी त्यांच्या प्रश्नांचे निरसन करीत आहेत.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची निवडणूक विभागाने पूर्ण तयारी केली आहे. ७१ ग्रामपंचायतीत २३४ प्रभागांतील २५२ मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. या निवडणुकीत ६२७ सदस्य विजयी जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी एकूण एक लाख १५ हजार ९२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६० हजार २४२ पुरुष व ५५ हजार ६८५ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक कामासाठी एकूण ११५२ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात १११२ मतदान केंद्राध्यक्ष, ३० निवडणूक निर्णय अधिकारी, ३० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि ८० इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सूचनांचे पालन करावे
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गरज आहे. उमेदवारी अर्ज भरताना काही अडचणी आल्या तर त्या त्या भागातील अधिकारी, कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील. उमेदवारांनी नवीन बँक खातेही उघडणे गरजेचे आहे.
बाबूराव चंडोल
नायब तहसीलदार, अंबड
कॅप्शन : अंबड तहसील कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यासाठी करण्यात आलेली तयारी.