जालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण-रुंदीकरण, तलावांमधील गाळ काढणे, लोकसहभागातून करावयाची कामे यासाठी प्रशासनाने डीपीडीसीतून कोट्यवधी रुपये खर्च करून तब्बल तेरा पोकलेन मशीन खरेदी केल्या. मात्र, मागील वर्षभरापासून या मशीन एकाच जागी उभ्या आहेत. दुसरीकडे पोकलेन मशीन मिळत नाही म्हणून प्रशासनाने जलसंधारणाच्या कामासाठी मशीन उपलब्ध असणा-या खाजगी व्यक्तींची नोंदणी सुरू केली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत जिल्ह्यात ३९८ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत झाली असून, शेतक-यांचा चांगला फायदा झाला आहे. जलसंधारणाच्या कामांना अधिक गती देता यावी, तसेच शासकीय यंत्राद्वारे प्रत्येक तालुक्यात लोकसहभागातून करण्यात येणा-या खोलीकरणाच्या कामांना मोफत मशीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन विभागातून मोठा निधी खर्च करून तेरा पोकलेन यंत्रे खरेदी करण्यात आली. प्रत्येक तालुक्याला एक यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. ज्या गावातील नागरिक डिझेल खर्च देण्यास तयार आहेत, तेथे या मशीन उपलब्ध करून खोलीकरणाची कामे करण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले. त्यामुळे लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामे झाली. तालुकानिहाय उपविभागीय अधिकाºयांना या मशीनची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षभरापासून कोट्यवधी रुपयांच्या या मशीन एकाच जागी उभ्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसºया टप्प्यात १४९ गावांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या गावांमध्ये मंजूर कामे जूनअखेर पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. मात्र, अद्याप एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. जलसंधारणाच्या कामांसाठी मशीन मिळत नसल्याची ओरड संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींकडे पोकलेन मशीन उपलब्ध आहे, त्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत सुमारे पन्नासहून अधिक व्यक्तींनी नोंदणी केली आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या हक्काच्या मशीन धूळ खात पडून आहेत.----------
तब्बल तेरा पोकलेन धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:51 AM