लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथे होणा-या नियोजित सीडपार्कसाठी जालना परिसरात १३० एकर जमीन विकसित करून देण्याचे आदेश शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिले आहेत. सीडपार्कच्या उभारणीमुळे जिल्ह्यातील बियाणे उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. सीड पार्कसाठी जालना तालुक्यातील पानशेंद्रा परिसरात जागा देण्याचे नियोजन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.कृषी व पशुसंवर्धन विभागाने ५ डिसेंबर २०१७ रोजी याबाबत आदेश काढला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १३० एकर जागा सीड पार्कला उपलब्ध करून द्यावी. जागा उपलब्ध झाल्यानंतर सीडहब अंतर्गत बियाणे उद्योगास लागणा-या सामुदायिक पायाभूत सुविधांची महाबीज, बीज प्रमाणिकरण यंत्रणा, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ व कृषी विभागामार्फत उभारणी करावी. तसेच सीडपार्कमध्ये विकसित जमिनीचे भूखंड एमआयडीसीने त्यांच्या प्रचलित धोरणानुसार बियाणे उद्योगांना विक्री करावे, असे आदेशात म्हटले आहे. मागील महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना सीडपार्क उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. बियाणे उत्पादनात सुमारे २०० कंपन्या जालना, औरंगाबाद, बुलडाणा जिल्ह्यात आहेत. बियाणे उद्योगात राज्यातील वार्षिक उलाढाल पाच हजार कोटींची आहे. जालना परिसरात बियाणे उद्योगात तीन हजार कोटींची उलाढाल होते. जिल्ह्यात २० हजार शेतकरी बीजोत्पादनात असून त्यांना वार्षिक सुमारे २५० कोटींचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे. तसेच मजुरांना प्रतिवर्षी १५० कोटींचा रोजगार मिळत आहे. त्यामुळे बियाणे उद्योगासमोरील अडचणी दूर करण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करून बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्मितीद्वारे रोजगार आणि गुंतवणूक वाढीसाठी सीड पार्क निर्मितीचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
जालना सीडपार्कला १३० एकर जमीन; उद्योगाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:35 AM