जालना : दिवाळीचा सण चार दिवसांवर आला आहे. असे असतानाही एसटी महामंडळातील १३०० कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे दिवाळीचा सण साजरा कसा करावा, याची चिंता महामंडळातील कर्मचाऱ्यांना सतावत आहे.
कोरोनाच्या काळात जोखमीचे काम पत्कारून एसटी महामंडळातील कर्मचारी काम करत आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील चार आगारांमधील १ हजार ३०० कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचा पगार थकलेला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाची अद्याप खरेदी करता आली नाही. शिवाय मुला- बाळांनाही कपडे घेता आले नसल्याची खंत एसटी महामंडळातील चालक- वाहकांनी व्यक्त केली. तर एक- दोन दिवसांत कर्मचाऱ्यांचे पगार होतील, अशी माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
चरितार्थ थांबलामागील दोन महिन्यांपासून महामंडळातील कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने अनेकांच्या घरी किराणा साहित्य नाही. शिवाय मुलांच्या शिक्षणाची फीसही देता येत नाही. शिवाय घराचे हप्तेही थांबलेले असल्याची माहिती देण्यात आली.
दिवाळीसाठी ४८ बसेसदिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून ४८ बसेस विविध मार्गांवर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष करून औरंगाबाद, पुणे, नाशिक, जळगाव, पंढरपूर, सोलापूर इ. मार्गावर बसेस सोडण्यात येणार आहेत.
थकीत पगारासाठी सतत पाठपुरावा मागील दोन महिन्यांपासून थकीत असलेला पगार मिळविण्यासाठी शासनस्तरावावर पाठपुरावा सुरू आहे. अशातच दिवाळी सण जवळ आला आहे. उधारीवर किराणा व मुलांना कपडे खरेदी करून दिवाळीचा सण साजरा करणार आहोत. - प्रकाश कर्वे. विभागीय सचिव, एसटी. कामगार कर्मचारी संघटना
जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे मागील काही महिन्यांतील पगार थकलेला आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना थकित पगार मिळावा, यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. - प्रमोद नेव्हूळ, विभागीय वाहतूक अधिकारी, जालना