जालना : शासनाच्या राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील १९२ निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरूस्ती, पुनर्बांधणीसाठी ३८ कोटी ६६ लाख १३ हजार रूपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातील ८० टक्के निधी हा शासन स्तरावरून प्राप्त होणार असून, उर्वरित निधी दहा टक्के निधी लोकवर्गणी व दहा टक्के निधी जिल्हा परिषदेसह इतर विविध माध्यमातून उभा केला जाणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निजामकालीन शाळा असून, त्यातील बहुतांश शाळांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही गैरसोय होत होती. मराठवाड्यातील निजामकालीन शाळांची दुरूस्ती करण्यासाठी शासन स्तरावरून राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत ३८ कोटी ६६ लाख १३ हजार रूपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यातील ८० टक्के रक्कम म्हणजे ३० कोटी ९२ लाख रूपयांचा निधी शासनस्तरावरून उपलब्ध करून दिला जाणार आहे. उर्वरित २० टक्के म्हणजे ७ कोटी ७३ लाख २२६ रूपयांचा निधी उभा करावा लागणार आहे. यामध्ये पुनर्बांधणीसाठी ६ कोटी ५६ लाख ६४ हजार तर मोठ्या दुरूस्तीसाठी १ कोटी १६ लाख ५८ हजार ६०० रूपयांचा निधी उभा करावा लागणार आहे. या वीस टक्क्यांमध्ये दहा टक्के निधी हा जिल्हा परिषद सेस फंड, १५ वा वित्त आयोग, आमदार, खासदार निधी, मानव विकास मिशन मधून उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर दहा टक्के निधी हा लोकवाट्यातून उभा करावयाचा आहे. एकूणच शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील निजामकालीन मोडकळीस आलेल्या तब्बल १९२ शाळांचा कायापालट होणार आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही गैरसोय दूर होणार आहे.
चौकट
इतर वर्ग खोल्यांचे ही काम
या योजनेंतर्गत संबंधित शाळांमध्ये विविध उपक्रमांसाठी ८ खोल्या, कला विभागासाठी चार, संगणक कक्षासाठी ५१ खोल्या, प्रयोगशाळेसाठी सहा तर वाचनालयासाठी १० खोल्यांचे काम करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
समितीचे राहणार लक्ष
निजामकालीन शाळा वर्गखोल्यांची दुरूस्ती, पुनर्बांधणीची काम विशेष समितीच्या देखरेखीखाली होणार आहे. यात समिती अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी काम पाहणार आहेत. तर सदस्य म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीतील एक सदस्य राहणार आहे. तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंता सदस्य सचिव राहणार आहेत.
तालुकानिहाय शाळांची संख्या
अ क्र तालुका शाळा वर्ग खोल्या
१. जालना ३१ ६१
२. बदनापूर- १५ ४१
३. अंबड २२ ५९
४. घनसावंगी ३६ ७३
५. परतूर २० १२
६. मंठा २४ १३
७. भोकरदन ३१ ५३
८. जाफराबाद १३ २०
एकूण १९२ ३३२