लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शेतातील काम आटोपून बैलगाडी घेऊन घरी जात असताना, अरुंद रस्त्यामुळे एका शेतक-याची बैलगाडी अचानक डाव्या कालव्यात गेली. या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, मात्र सुदैवाने शेतक-याचे प्राण वाचले. परतूर तालुक्यातील लोणी पुलाजवळून वाहणा-या डाव्या कालव्यात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.लोणी येथील शेतकरी शेख मुस्तफा शेख बिबन हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे निघाले होते. नाथसागराच्या डाव्या कालव्याच्या कडेने शेतातून ये-जा करण्यासाठी बैलगाडी रस्ता आहे.अरुंद रस्त्याला कालव्याच्या बाजूने तीव्र उतार असल्याने लोणी पुलाजवळ शेख मुस्तफा यांची बैलगाडी थेट कालव्याच्या पाण्यात गेली. नाथसागरातून पाण्याचे आवर्तन सोडलेले असल्याने कालवा भरून वाहत आहे. त्यामुळे शेख मुस्तफा बैलगाडीसह पाण्यात बुडाले. बैल गाडीला जुंपलेले असल्यामुळे, तसेच कालव्याच्या दोन्ही बाजूंनी उतार असल्यामुळे त्यांना वर चढताच आले नाही. त्यामुळे दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला.घाबरलेले शेख मुस्तफा कसेबसे पोहत पाण्यातून बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर परिसरात काम करणारे शेतकरी विलास यादव, बाळू जाधव, राजेश चव्हाण, नयूब शेख, श्रीरंग यादव, कैलास भिंगारे, नारायण वैराल्ले आदी कालव्याकडे धावले. या शेतक-यांनी दोरीच्या साहाय्याने डाव्या कालव्यात उतरून मृत बैल व बैलगाडी ओढून बाहेर काढली. ९० हजारांची बैलजोडी दगावल्याने शेख मुस्तफा यांना धक्का बसला आहे.
आष्टीजवळ अरुंद रस्त्यामुळे कालव्यात पडून बैलजोडी दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:31 AM