लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शहरातील तीन चित्रपटगृहांत ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विविध संघटनांनी चित्रपट दाखवू नये, असे निवेदन दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला. मात्र, बुधवारी रात्री दगडफेकीच्या घटनेने गुरुवारी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.नीलम चित्रपटगृहात पहिला खेळ करणी सेनेसह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी दोन खेळ सुरु करण्यात आले. मात्र केवळ ३० टक्के तिकीट विक्री झाल्याचे चित्रपटगृह मालकांनी सांगितले.जालना शहरातील नीलम, रत्नदीप आणि नटराज या चित्रपटगृहांत हा चित्रपट दाखविला जात आहे. या चित्रपटगृहांच्या मालकांना हा चित्रपट दाखवू नये, या मागणीचे निवेदन राजपूत समाजासह, करणी सेना, महाराणा ब्रिगेड इ. संघटनांनी दिले होते. त्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी चित्रपटगृह मालक व विविध संघटनांच्या पदाधिका-यांची बुधवारी बैठक घेतली. यात चित्रपट पाहावा त्यानंतर भूमिका घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी सामाजिक संघटनांना केले. दरम्यान, नीलम, रत्नदीप या चित्रपटगृहांवर बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास काही तरुणांनी दगडफेक केली. यात चित्रपटगृहांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर दक्षतेचा उपाय म्हणून पोलिसांनी तिन्ही चित्रपटगृहाबाहेर बंदोबस्त ठेवला. सकाळचे दोन शो रद्द करण्यात आले. तर सहा आणि नऊ वाजताचे शो सुरु करण्यात आले. मात्र, या शोंना फारशी गर्दी नव्हती. या दोन्हींची सुमारे ३० टक्केच तिकीट विक्री होऊ शकल्याचे चित्रपटगृह मालकांनी सांगितले.दगडफेक प्रकरणी सदर बाजार आणि कदीम जालना पोलीस ठाण्यात धनसिंग प्रतापसिंग सूर्यवंशी (३४), ईश्वर शिवाजी बिल्लोरे (३२), सचिन शंकरराव क्षीरसागर (३२), कालूसिंग धन्नूसिंग राजपूत (३२), विनोद सिसाराम कौशब (२०), सचिन भास्कर हिवाळे (२२), राजसिंग सामसिंग कलाणी (२४), मदल गोपाल खोलवाळ (२८) या आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या सर्वांची पोलीस कोठडीत रवानगी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
जालना शहरातील ३ चित्रपटगृहांत २ शो रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:34 AM