जालना : जालना लोकसभा मतदार संघामध्ये २०१९ च्या निवडणुकीत ९ राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षासह ११ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी या सर्व उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे.जालना लोकसभा मतदार संघाचा विचार करता यात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री या तीन मतदार संघांचा समावेश होतो. जालना शहरात ३ लाख २० हजार ४७२ मतदार आहेत. असे असले तरी येथे मंगळवारी झालेल्या मतदानाच्या वेळी टक्केवारी इतर विधानसभेच्या आकडेवारीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले. या मागील कारणे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कडक ऊन आणि मतदारांचा निरूत्साह हे देखील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे.शहरात अनेक भागांमध्ये पोलचिट मिळाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.या उमेदवारांचे भविष्य सीलबंदरावसाहेब दानवे, विलास औताडे, महेंद्र सोनवणे, डॉ. शरदचंद्र वानखेडे, उत्तम राठोड, गणेश चांदोडे, अॅड. त्रिंबक जाधव, प्रमोद खरात, फेरोज अली, अण्णासाहेब उगले, अनिता खंदाडे, अरुण चव्हाण, अहेमद शेख, ज्ञानेश्वर नाडे, अॅड. योगेश गुल्लापेल्ली, रत्न लाडंगे, राजू गवळी, शहादेव पालवे, लीलाबाई सपकाळ आणि शाम सिरसाट यांचा समावेश आहे.अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथील मतदान केंद्रावर बाळासाहेब धोंडीराम उबाळे (३५) या युवकाने ईव्हीएमचा फोटो मोबाईलमध्ये काढल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध १८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना लोकसभा मतदार संघात वेगवेगळ्या तांत्रिक कारणामुळे ३१ मतदान यंत्र (ईव्हीएम) बदलल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी नंदकर यांनी सांगितले. यात जालना विधानसभा ५, भोकरदन ३, पैठण ८, बदनापूर ५, सिल्लोड ३ आणि फुलंब्री विधानसभा मतदार संघातील ७ ईव्हीएम बदलण्यात आले.दरम्यान, राखीव ईव्हीएम ४८८ ठेवण्यात आले होते. त्यामुळे ऐन वेळेवर कुठलीच अडचण आली नसल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, बदनापूर मतदार संघातील काजळा येथे ईव्हीएम वेळेत सुरू न झाल्याने मतदारांना दीड तास वाट पहावी लागली. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
२० उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:12 AM