जालना : राज्य परिवहन महामंडळाने आता प्रवाशांसाठी इलेक्ट्रिक बस चालविण्याचा निर्णय घेतला असून, जालना जिल्ह्यातून २० बसेसची मागणी करण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरील प्रक्रियेनंतर या बसेस जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना आता विजेवरील इलेक्ट्रिक बसमधील सोयी-सुविधांचा लाभ घेता येणार आहे. शिवाय पर्यावरण संवर्धनासाठी या बसेस पूरक राहणार आहेत.
या मार्गावर धावणार बसेस
जालना जिल्ह्यासाठी वीस बसेसची मागणी करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक बसेस जालना- औरंगाबाद, जालना- बीड, जालना- बुलडाणा यासह इतर जिल्ह्यांच्या मुख्यालयावरील मार्गावर धावणार आहेत. बसची संख्या वाढल्यानंतर इतर मार्गांचा समावेश होणार आहे.
वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू
वाढत्या इंधन दराचा फटका महामंडळाला बसत आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहने आता रस्त्यावर उतरविण्याची तयारी शासन करीत आहे.
या धर्तीवरच राज्य परिवहन महामंडळातही इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत; परंतु वरिष्ठस्तरावरील प्रक्रियेनंतर या बसेस जिल्ह्याला मिळणार आहेत.
कोठे होणार चार्जिंग स्टेशन
जिल्ह्यात भविष्यात दाखल होणाऱ्या बसेस या प्रामुख्याने इतर जिल्ह्यांतील प्रमुख शहरात धावणार आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील येथील चार्जिंग स्टेशन स्टेशन हे जालना येथील मुख्यालयीच राहणार आहे. इतर ठिकाणी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
खर्चात होणार बचत
डिझेलवरील बसेसवर होणारा खर्च हा अधिक आहे. डिझेलचा खर्च, वाहनांच्या मेन्टनन्सवर करावा लागणारा खर्च अधिक आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण भागातील बससेवांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरही याचा परिणाम होतो; परंतु आता इलेक्ट्रिक बसेस जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे इंधनावरील खर्चात बचत होणार असून, मेन्टनन्सचाही खर्च कमी होणार आहे. त्यामुळे आपसूखच महामंडळाचे उत्पन्न वाढणार आहे.
वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर
वरिष्ठ कार्यालयाकडून मागविण्यात आलेल्या अहवालानुसार २० बसेसची मागणी केली आहे. वरिष्ठ स्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याला बसेस मिळतील. या बसेसचा जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होईल.
-प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक