जालना : बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई केली. यावेळी ६८ लाख २२ हजार रुपयांची २२७४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अमोल मदन, केशवराव व्यंकट मदन (रा. केळीगव्हाण, ता. बदनापूर) यांच्याविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, केळीगव्हाण येथे गावालगत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा करुन ठेवला असून, त्याची चोरटी विक्री केली जात आहे. या माहितीवरुन सदर ठिकाणी पाहाणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आढळून आला. सदर वाळूच्या मालकाबाबत विचारणा केला असता, सदर वाळूचा अवैध साठा हा अमोल मदन व केशवराव मदन यांचा असल्याचे समजले. महसूल विभागाचे पथक बोलवून या वाळूसाठ्याची मोजमाप करुन ५० लाख २२ हजार रुपयांची १६७४ ब्रास वाळू जप्त केली. तसेच केळीगव्हाण शिवारातीलच राजेवाडी साठवण तलावात अवैध वाळूसाठा आढळला. हा वाळूसाठाही अमोल मदन व केशवराव मदन यांचा असल्याचे समजले. या वाळूचा पंचनामा करुन मोजमाप करण्यात केली. येथून १८ लाख रुपयांची ६०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या दोन्ही ठिकाणाहून ६८ लाख २२ हजार रुपयांची २ हजार २७४ रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे.
पोउपनि ज्ञानेश्वर सानप यांच्या फिर्यादीवरुन अमोल केशवराव मदन, केशवराव मदन यांच्या विरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. ज्ञानेश्वर सानप, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, गोकुळसिंग कांयदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, किशोर जाधव, संजय राऊत, शमशाद पठाण, मंडळअधिकारी यु. पी. कुलकर्णी, तलाठी के. के. ढाकणे यांनी केली.