लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देण्यासाठी केंद्रामार्फत उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ४३७ कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आल्यामुळे या कुटुंबांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे.ग्रामीण भागात आजही बहुतांश घरामध्ये महिला लाकडे, गव-या व अन्य पालापाचोला गोळा करून चुलीवर स्वयंपाक करतात. गरीब घटकातील महिलांना चुलीसाठी लागणाºया जळतणासाठी रानावनात फिरावे लागते.तसेच चुलीवर स्वयंपाक करताना धुरामुळे महिलांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. विशेषत : डोळ्यांचे आजार जडतात. यापासून गरीब कुटुंबांना, विशेष महिलांना मुक्ती मिळावी या उद्देशाने केंद्रमार्फत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही, अशा कुटुुंबांना मोफत गॅस वाटप केले जात आहे. विविध गॅस एजन्सीच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही योजना राबवली जात आहे.आजापर्यंत जिल्ह्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यामध्ये जालना तालुक्यातील सर्वाधिक ५०१६ लाभार्थ्यांचा समावेश आहे.भोकरदन तालुक्यात उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या केवळ ४५५ इतकी आहे. उज्ज्वला गॅस योजना २०१९ पर्यंत राबविण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी कुटुंबांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असे सूत्रांनी सांगितले.
२२ हजार कुटुंबांची धुरापासून मुक्ती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:50 AM