जालना : बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथे होत असलेल्या ड्रायपोर्ट जालना-औरंगाबाद मार्गाला चौपदरी रस्त्याने जोडण्यात येणार आहे. यासाठी नागेवाडी शिवारातील नऊ हेक्टर जमिनीचे संपादन होणार असून, शेतक-यांना द्यावयाच्या मोबदल्यासाठी २४ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथे सुमारे पाचशे हेक्टरवर ड्रायपोर्ट उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सुरक्षा भिंतीचे बांधकाम, जमीन सपाटीकरण, अंतर्गत कामांचा आराखडा ही कामे सध्या वेगाने सुरू आहेत. ड्रायपोर्टमधून दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी जालना-औरंगाबाद मार्गापर्यंत एक किलोमीटर चौपदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी नागेवाडी शिवारातील नऊ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे काम महसूल प्रशासनाकडून सुरू आहे. नागेवाडी शिवारातील गट क्रमांक २९९, २९८, २७८, २७१ आणि २७३ मधील चार हेक्टर जमिनीचे यासाठी संपादन केले जाणार आहे. यासाठीची जाहीर नोटीस गावातील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली असून, संपादित केल्या जाणा-या जमिनीचे क्षेत्र निश्ति करण्यात आले आहे. उर्वरित पाच हेक्टर शासकीय गायरान जमीन आहे. खाजगी वाटाघाटीने या जमिनीची खरेदी केली जाणार आहे. यासाठी महसूल प्रशासनाने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे जमीन संपादनाचा मावेजा देण्यासाठी पंधरा दिवसांमध्ये २४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जेएनपीटीकडून मावेजा रक्कम मिळाल्यानंतर चौपदरीकरणासाठी प्रत्यक्ष जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितले.------------------रेल्वेलाईनसाठी सात निविदाड्रायपोर्ट ते औद्योगिक वसाहतीमधील जुन्या दिनेगाव रेल्वेस्थानकापर्यत स्वतंत्र रेल्वेलाईन अंथरण्यात येणार आहे. इंडियन पोर्टरेलच्या माध्यमातून केल्या जाणा-या या काामसाठी सात निविदा प्राप्त झाल्या असून, लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. आगामी काळात ड्रायपोर्ट थेट नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गास जोडण्यात येणार आहे.---------------
ड्रायपोर्टपर्यंतच्या चौपदरीकरणासाठी हवेत २४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:24 AM