लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील आठ तरूणाना पॅराकमांडो भरतीमध्ये नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांची २४ लाख रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील दोन ठकसेनांविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दानापूर येथील मयूर गणेश शिंंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्यासह विशाल जगन्नाथ फुके, सचिंन रामदास दळवी, योगेश नायबराव दळवी, शेख कारमान ईसाक, दिलीप हिंमत दळवी, अजीम शेख बुढन, (सर्व रा़ दानापूर) व विनोद अप्पा जामकर, रा. वडशेद या मित्रांनी नांदुरा, (जि़ बुलडाणा) येथे सैन्य भरती तयारी करण्यासाठी माय करिअर सैनिक अॅकडमीमध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्यासाठी मासिक फीस ६ हजार रूपये ठरविण्यात आली होती. त्यामध्ये राहणे, खाणे व प्रशिक्षण असे ठरले होते. मात्र काही दिवसानंतर अकॅडमीचे संचालक विश्वजीत हिंमतराव रायलकर उर्फ सोनु व मुन्ना येसोकर (रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) यांनी बाजूला बोलावून सांगितले की, नाशिक येथे पॅराकमांडो भरती आहे. त्याठिकाणी आमची चांगली ओळख असून, तुम्हाला आम्ही नोकरी लावून देतो. यासाठी प्रत्येकी ५ लाख रूपये द्यावे लागतील. तुमच्या गावातील माणिकराव दगडूबा दळवी माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडे पैसे जमा करा, असे सांगितले.यानंतर आम्ही दोन-तीन दिवसांमध्ये पैशाची व्यवस्था केली.माणिकराव दळवी यांच्यामार्फत अकॅडमीचे संचालक विश्वजित रायलकर उर्फ सोनू व मुन्ना येसोकर यांना बाभूळगाव (ता़ भोकरदन) येथे बोलावले. त्याठिकाणी त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये १५ लाख रूपये दिले. त्यानंतर एक महिन्याने सप्टेंबर २०१७ मध्ये नाशिक येथे वैद्यकीय तपासणी असल्याचे सांगून, गाडगेबाबा मठ नाशिक येथे बोलावले. सर्व शैक्षणिक कागदपत्रे, सह्या, अंगठे घेऊन तुम्ही आता घरी जा एक महिन्यामध्ये तुम्हाला घरी नोकरीची आॅर्डर येईल असे सांगितले. यानंतर १० ते १५ दिवसांनी माणिक दळवी यांच्या सांगण्यावरून शेख कामरान शेख ईसाक, अजिम शेख बुुढन, विनोद जामकर यांनी दानापूर येथे प्रत्येकी तीन लाख या प्रमाणे ९ लाख रूपये त्यांना दिले असे एकूण २४ लाख रूपये त्यांना दिले. यानंतर आॅर्डर काही येईना म्हणून, आम्ही दोन महिन्यापूर्वी नांदुरा येथील अकॅडमीच्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणची अकॅडमीच गायब झाली होती. त्यानंतर त्यांच्या घराचा पत्ता काढून अंजनगाव सुर्जी या ठिकाणी गेलो असता ते घरी नव्हते. त्यांचे आई वडील घरी होते. त्यांनी सांगितले की, ते घरी आल्यावर तुमचे पैसे देण्याचे सांगतो. मात्र पैसे परत मिळाले नाहीत. ऐन दुष्काळात २४ लाखांची फसवणूक झाल्याने युवकांच्या पायाखालची जमीनच सरकली.पोलीस पथक अंजनगावला रवानाघरची परिस्थिती हलाखीची असल्याने या सुशिक्षित तरूण बेरोजगारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्याशी संपर्क साधला. घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर २१ फेबु्रवारी रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात या अकॅडमी चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, भोकरदन पोलिसांचे एक पथक आरोपीला अटक करण्यासाठी अंजनगाव सुर्जी येथे रवाना झाले आहे़एकाला रात्री उशिरा केले जेरबंदउपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी सांगितले की, सदरील अकॅडमी चालकांनी यापूर्वी बुलडाणा, जळगाव जिल्ह्यातील अनेक तरूणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असून, त्या संदर्भात गुन्हे दाखल केलेले आहेत. या दोनपैकी मुन्ना येसोकार याला रात्री उशिरा भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती जायभाये यांनी दिली.
नोकरीचे आमिष दाखवून २४ लाखांना चुना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:48 AM