राजूर : वेगवेगळया ठिकाणांवरून जमा केलेला तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्याविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री हसनाबाद फाट्यावर कारवाई केली. या कारवाईत २८० क्विंटल तांदळासह ३९ लाख ८३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जीवनावश्यक असलेला तांदळाचा साठा ट्रकमधून हसनाबाद ते तळेगांव मार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, जमादार गोकुळसिंग कायटे, जगदीश बावणे, रूस्तुम जैवाळ, किशोर पुंगळे, संजय राऊत यांना हसनाबाद फाट्याजवळील वजनकाट्यावर ट्रक (क्रमांक एम.एच.२६, ए.डी.२१४५) आढळून आला.
ट्रकची पाहणी केली असता त्यात जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत असलेल्या तांदळाची साठवणूक करून त्याचे परिवहन व वितरण बेकायदेशीर करीत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये प्रकाश सुखदेव पगारे (रा. औराळा, ता. कन्नड) या चालकाला विचारणा केली असता, त्याने साबेरखॉ पठाण, रऊफखाँ पठाण, अस्लमखॉ पठाण, तालेबखॉ पठाण (सर्व रा. तळेगांव. ता. फुलंब्री) यांच्या मालकीचा तांदूळ असल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रक व तांदळासह ३९ लाख ८३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, गोकुळसिंग कायटे, जगदीश बावणे, रूस्तुम जैवाळ, किशोर पुंगळे, संजय राऊत यांनी केली.