रांजणी (जालना) : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी शिरीष वझरकर यांनी आयुर्वेदिक चिया बियाणाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. चिया बियाणाची शेतीसाठी केवळ ३ हजारांचा खर्च आला असून, या शेतीतून काढलेल्या उत्पादनातून त्यांना पाच लाखांचे उत्पन्न होणार आहे. शेतकरी शिरीष वझरकर यांनी बदलत्या हवामानात परवडणाऱ्या शेतीच्या केलेल्या या प्रयोगाची तालुक्यात चर्चा होत आहे.
जालना शहरात नुकत्याच झालेल्या कृषी प्रदर्शनात या पिकाच्या लागवडीची माहिती देण्यासाठी शिरीष वझरकर यांनी स्टाॅल लावला होता. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांनी चिया बियांची लागवड कशी करायची याची माहिती दिली. कोणत्याही प्रकारची माती आणि हवामानात ही शेती करता असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचा निचरा होणारी हलक्या जमिनीत हे पीक चांगले येते. आपल्याकडील पिकांप्रमाणे या पिकावर फवारणी, खताची गरज भासत नाही. या बियांना प्रतिक्विंटल १ लाख २० हजार रुपये भाव आहे.
अमेरिकेत होते चिया बियाची लागवडअमेरिका येथील हे मूळ पीक आहे. आयुर्वेदात या बियांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या वजन घटवण्यासह अन्य विविध आजारांवर मात करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. बाजारात चिया बियांची किंमत एक ते दीड हजार रुपये प्रतिकिलो आहे. एका एकरात तीन महिन्यांत सरासरी ४ ते ५ क्विंटल चिया बियाचे उत्पादन होते. त्यातून शेतकऱ्यास जवळपास ४ ते ५ लाख उत्पन्न मिळवता येतात. हवामान बदलाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना ही शेती कमी खर्चात मोठा नफा मिळवून देणारी ठरू शकते. - शिरीष वझरकर, शेतकरी.