जालना : जिल्ह्यात अवैधरित्या विक्री, वाहतूक केला जाणारा सव्वा कोटी रूपयांचा तब्बल ११० टन गुटखा अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासनाने जप्त केला. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत ही धडक कारवाई करण्यात आली आहे.गुटख्याची वाहतूक, विक्री करण्यास शासनाने बंदी घातली आहे. मात्र, गुटखा तस्त्करांनी अवैधरित्या गुटखा विक्री सुरूच ठेवली आहे. या गुटखा विक्रेत्यांविरूध्द अन्न प्रशासनासह पोलीस प्रशासनाने चालू वर्षात धडक कारवाई हाती घेतली आहे. चालू वर्षात २१ ठिकाणी धडक कारवाई करून १ कोटी २१ लाख ११ हजार ६८३ रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यातील बहुतांश गुटखा नष्ट करण्यात आला आहे. तर मागील काही महिन्यांतील जप्त केलेल्या गुटख्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, वरिष्ठांकडे अहवाल देण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर तो गुटखाही जप्त केला जाणार आहे. जिल्ह्यातील ६५८९ जणांनी अन्न अस्थापनांसाठी नोंदणी केली आहे.अन्न प्रशासनाने विविध दुकानांची तपासणी केली आहे. या तपासणीतून १०५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या नमुन्यांमध्ये काही दोष आढळले तर संबंधित व्यवसायिकाविरूध्द कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
जालना जिल्ह्यात तब्बल ११० टन अवैध गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:21 AM