जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीच्या ४,१६४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तरुणांनी मोठा सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात तब्बल ३० टक्के तरुण गावचे कारभारी झाले आहेत.
जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६९८ जागांसाठी मतदान झाले. जिल्ह्यात ८२.३२ टक्के मतदान झाले होते. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, १२,३३२ पैकी ४,१४४ उमेदवारांनी विजय मिळवला. यात तरुण उमेदवारांचा मोेठ्या प्रमाणात समावेश आहे.
भोकरदन तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार
जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वाधिक तरुण उमेदवार निवडून आले आहेत. गावाचा विकास खुंटल्याने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरूणांनी सहभाग घेतल्याचे चित्र आहे. भोकरदन तालुक्यात जवळपास १६ टक्के तरुण उमेदवार निवडून आले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून गावाचा विकास खुंटला आहे. ज्येष्ठ मंडळींना डिजिटल युगाचे ज्ञान नाही. त्यामुळे आमच्या गावातील बहुतांश तरूण निवडणुकीत उभे राहिले होते. मतदारांनीही त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.
शंतनू काकडे, जयपूर, मंठा
माझ्या गावाची राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख व्हावी, यासाठी मी यंदाची निवडणूक लढवली आणि विजयीही झालो आहे. आता फक्त गावाचा विकास करायचा आहे.
पंकज सोळुंके, गोंदी, अंबड
गावाच्या विकासासाठी मी निवडणुकीत उभा राहिलो. विकासाच्या नावावरच ही निवडणूक लढवली आहे. आता विजयीही झालो असून, आता फक्त गावाचा विकास करायचा आहे.