संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या स्टील उद्योगाला बुस्टर डोस देण्यासाठी केंद्र सरकारच्या पोलाद मंत्रालयाने ३०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देऊ केले आहे. यात स्टील उद्योगाला आरएनडीसह नवीन तंत्रज्ञानाचा अवंलब करण्यासाठी या निधीचा उपयोग करता येणार असल्याची माहिती जालना येथील मेडियम - स्मॉल अँड मायक्रो इंडस्ट्री महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश मानधनी यांनी लोकमतशी बोलताना दिली.देशातील प्रमुख स्टील उद्योजगांची कार्यशाळा एमएसईएमने १८ मे रोजी मुंबईत घेतली होती. त्या कार्यशाळेस केंद्रीय पोलाद मंत्री बिरेंद्रसिंग चौधरी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी आणि स्टील उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री बिरेंद्रसिंग यांनी स्टील उद्योगाला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन देऊन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांना त्यांच्या स्टील उद्योगात नव-नवीन तंत्रज्ञान अथवा काही इनोव्हेशन करायचे झाल्यास त्यासाठी निधी देऊ असे आश्वासन दिले होते.त्या आश्वासनांची आता या ३०० कोटी रूपयांच्या विशेष पॅकेजमुळे एक प्रकारची पूर्तता झाली असल्याचे मानधनी यांनी सांगितले.या निधीच्या माध्यमातून स्टील उद्योजकांनी त्यांचे इनोव्हेशनचे प्रस्ताव हे एसआरटी एमआय अर्थात स्टील रिसर्च अँड टेक्नॉलजी मिशन आॅफ इंडिया या सरकारी संस्थेकडे सादर करायचे आहेत. या संस्थेने हे प्रस्ताव मंजूर केल्यास लगेचच संबंधितांना आवश्यक असलेला निधी मिळू शकतो. त्यासाठी निधी किती द्यावा हा अधिकार सर्वस्वी एसआरटीएमआय या संस्थेचा राहणार असल्याचेही मानधनी यांनी सांगितले.देशातील स्टीलची गरज लक्षात घेता. २०३० पर्यंत स्टीलचे उत्पादन हे ३०० मिलियन टन करण्याचा उद्दिष्ट असल्याने या उद्योगाला चालना देण्यासाठी आणखी विशेष प्रयत्न सरकारकडून होत आहेत. एकट्या महाराष्ट्रात सध्या २२३ स्टील उद्योग आहेत, तर रोलिंग मिलची संख्या ही एक हजार १२३ एवढी असल्याचे मानधनी म्हणाले.जालना : आणखी विशेष निधीसाठी प्रयत्नमुंबईत झालेल्या स्टील उद्योजकांच्या कॉन्फरन्सचे पहिले फलित हे या उद्योगाच्या इनोव्हेशनसाठी ३०० कोटी रूपये मिळाले आहेत. भविष्यात या उद्योगाला सरकारकडून आणखी निधी मिळणार असून, त्यासाठी स्टील उद्योजकांनी एकत्रित येऊन आपली क्षमता व महत्व पटवून द्यायचे आहे.- योगेश मानधनी, अध्यक्ष एमएसएमई, महाराष्ट्र
स्टील उद्योगासाठी ३०० कोटींचे पॅकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:47 PM