लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्र्गत जिल्ह्यातील अपूर्ण विहिरी ३० जून पर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे.जिल्ह्यात या सिंचन विहिरींच्या मंजुरीपासूनच ही कामे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र, हा वाद बाजूला ठेवून, तातडीने आहेत त्या विहिरी पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. त्यात जालना, घनसावंगी आणि मंठा या तीन तालुक्यांतील कामे अत्यंत कासवगतीने सुरू असल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर असून, ही अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ३० जून ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.या विहिरींच्या माध्यमातून सिंचन वाढीसह शेतकºयांना त्यांच्याच शेतात हक्काचे पाणी मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. एक विहीर खोदण्यासाठी संबंधित लाभार्थीला तीन लाख रूपयांचे अनुदान हे रोजगार हमी योजनेतून दिले जाते. या विहिरींची कामे मुदतीत न केल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिले आहेत.
सिंचन विहिरींसाठी ३० जूनची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:01 AM