जालना : गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला होता. परंतु, गत तीन महिन्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सरासरी ३६ टक्के पाण्याचा उपसा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६३.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
गतवर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सरासरी दीडशे टक्क्यांहून अधिक पाऊस जिल्ह्याच्या विविध भागात झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला नव्हे नदीकाठच्या शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्प अशा एकूण ६४ प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने भविष्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही मार्गी लागला आहे. परंतु, गत तीनच महिन्यात या प्रकल्पांमधून तब्बल ३६ टक्के पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ७८.७३ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये ५६.८२ टक्के असा जिल्ह्यात एकूण ६३.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रकल्पनिहाय स्थिती पाहता, जिल्ह्यातील ६४पैकी सहा प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. दोन प्रकल्पांमध्येही ० ते २५ टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा असून, हे प्रकल्पही मृतावस्थेत जाण्याच्या मार्गावर आहेत. ९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा आहे. ३१ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान तर १६ प्रकल्पांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांच्या दरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, गत तीन महिन्यातच ३६ टक्के पाण्याचा उपसा झाला असून, जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आगामी उन्हाळ्याचा कालावधी पाहता, जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणी उपशाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थितीजिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ७८.७३ टक्के पाणीसाठा आहे. यात जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्पात ७९.६३ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात ८७.८९ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ८२.१५ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात ६४.८४ टक्के, धामना प्रकल्पात ६९.५७ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ६८.१९ टक्के, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ८१.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.