जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.परतूर तालुक्यातील वाटूर येथील गणेश मंगल कार्यालयात मंगळवारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी प्रकल्पाचे राज्य संचालक विकासचंद्र रस्तोगी, प्रकल्पाचे जिल्हा अधीक्षक रफीक नाईकवाडी, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, गणेशराव बोराडे, शिवदास हनवते, मदन शिंगी, गणेशराव खवणे, रामेश्वर तनपुरे, गणपतराव वारे, नाथाराव काकडे, प्रदीप ढवळे, विष्णू फुफाटे, जिजाबाई जाधव, परतूरचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी राजेश तांगडे, माहिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहे. राज्य शासनाचा एक हजार २०० कोटी रुपयांचा वाटा यात असणार आहे. सहा वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्या-टप्प्याने ही योजना राज्यभरात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दहा गावांचे आराखडे तयार करण्यात येणार आहे. यामध्ये परतूर तालुक्यातील आंबा, खाडवीवाडी, हातडी, वाढोणा, मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव, अंभोरा जहागर, नायगाव ब्रह्म, देवगाव खवणे, जालना तालुक्यातील सेवली, सावरगाव बागडे या गावांचा समावेश आहे. प्रकल्प संचालक रस्तोगी म्हणाले की, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टिकोनातून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील १५ जिल्ह्यातील पाच हजार १४२ गावांत व जालना जिल्ह्यातील ३६३ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाचा गावनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार असून, या कामामध्ये गावातील प्रत्येकाने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहनही रस्तोगी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विविध सेवाभावी संस्थांचे चेअरमन, सदस्य यांच्यासह पदाधिकारी, व अधिका-यांची उपस्थिती होती.