जालना : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे. यात २ लाख १४ हजार युवक तर १ लाख ५२ हजार युवतींचा समावेश आहे. तर नुकताच राबविण्यात आलेल्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १८ हजार २१६ मतदारांची वाढ झाली आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी जोमात सुरू केली आहे. आजी-माजी मुख्यमंत्री संघटना बांधणीसाठी गावोगाव फिरत आहेत. सत्ताधारी विकास कामांचे ढोल वाजवित असून, विरोधक त्यांच्या चुकांवर बोट ठेवत समस्यांचा पाढा वाचत आहेत. मात्र, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाने मात्र, आपले मतदार नोंदणीचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभरात १३ लाख ८९ हजार ३३ मतदार होते. निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत गत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख १६ हजार ४३१ वर गेली होती. यात ७ लाख ९८ हजार ७५० पुरूष तर ७ लाख १७ हजार ६८१ महिला मतदारांचा समावेश होता.
लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणीसाठी १९ हजार ६१० जणांचे अर्ज दाखल झाले होते. यात ९६१६ युवक व ९९९४ युवतींचे अर्ज आले होते. छाननीनंतर १२९४ अर्ज वगळण्यात आले. तर १८ हजार ३१६ मतदारांची नोंद झाली. यात ८ हजार ८९८ युवक तर ९ हजार ४१७ युवतींचा समावेश आहे. गत पाच वर्षात १८ ते २९ वर्षे वयोगटातील तब्बल तब्बल ३ लाख ६६ हजार ४४५ युवा मतदारांची वाढ झाली आहे. यात २ लाख १४ हजार युवक तर १ लाख ५२ हजार युवतींचा समावेश आहे. १८ व १९ वर्षे वयोगटातील ३४ हजार ४०१ तर २० ते २९ वर्षे वयोगटातील १ लाख ३९ हजार ९५१ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण १५ लाख ५२ हजार ५९९ मतदार असून, यात ८ लाख १६ हजार २३२ पुरूष तर ७ लाख ३६ हजार ३६५ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, दुष्काळ, वाढती बेरोजगारी, उद्योग, शैक्षणिक सुविधा, आरोग्य यासह इतर योजनांची अंमलबजावणी, युवकांसमोरील प्रश्न आणि शासनाबाबत युवकांची भूमिका आगामी निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपातून समोर येणार आहे. त्यामुळे युवकांची अधिकाधिक मते आपल्याच पारड्यात पडावीत, यासाठीही राजकीय पक्ष विशेष लक्ष देत आहेत.
८० वर्षावरील ५४ हजार मतदार : मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर
जिल्ह्यात ८० वर्षावरील ५४ हजार २०५ मतदार आहेत. यात ८० ते ८९ वयोगटात ४४ हजार ७८, ९० ते ९९ वर्ष वयोगटात ८ हजार ६१८ तर ९९ वर्षाच्या वर वय असलेले ९१८ वयोवृध्द मतदारांचा समावेश आहे. या मतदारांनीही मतदान करावे, यासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे.लवकरच मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर राबविले जाणार आहे. या शिबिरातूनही काही युवक, युवतींची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाधिक युवक, युवतींनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आता लागणार ‘ओटीपी’यापूर्वी निवडणूक विभागाच्या वेबसाईटवरील सहा नंबरचा अर्ज कोठेही भरता येत होता. अर्ज भरून युवा मतदारांना नाव नोंदणी करता येत होती. मात्र, आता या प्रक्रियेत बदल करण्यात आले असून, युवक आपल्या मोबाईलवरूनही नाव नोंदणी करू शकणार आहेत. मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणारा ‘ओटीपी’ टाकल्याशिवाय नाव नोंदणीचा आॅनलाईन अर्ज उघडणार नाही, हे विशेष!