लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ६१ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळा या आतापासून जाणवत आहेत. आज घडीला १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, जवळपास २२१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यापूर्वी टंचाई निवारण्यासाठी ११ कोटी रूपयांचा टंचाई आराखडा तयार केला होता. आता नवीन आराखडा जानेवारी ते जून असा सहा महिन्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो जवळपास ३८ कोटी रूपयांचा असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात यंदा जानेवारीतच १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, ही टँकरची संख्या जून पर्यंत साधारणपणे ५०० पेक्षा अधिक टँकर लागू शकतील असा अंदाज आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आरखडा तयार केला असून, त्यासाठी भूजल सर्वेक्षणाचा अहवाल लक्षात घेऊन तयार केल्याचे सांगण्यात आले. एकूणच जिल्ह्यातील भूजल पाणीपातळीत सरासरी दोन मीटरने खोल गेल्याचा अहवाल आहे. यामुळे आहेत, त्या विहिरींची पाणीपातळी आताच खोल गेली आहे.जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जास्तीची टंचाई आताच जाणवत आहे.आता अंमलबजावणीवर भरएकीकडे पाणी टंचाईने ग्रामस्थ हैराण असल्याने त्यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून प्रशासनाने आवश्यक ते उपाय केले आहेत. पाणी टंचाईत निधी कमी पडू नये म्हणून सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधी कमी पडू नये म्हणून आम्ही योजना तयार केली आहे. आता तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांसह गाव पातळीवरील कर्मचाºयांनी अंमलबजावणी करून ग्रामस्थांना टंचाई जाणवू नये यासाठी तत्पर राहण्याची गरज आहे.नवीन आराखड्यात जवळपास एक हजार ५८३ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, एक हजार ४१२ गावे आणि वाड्यांमध्ये टंचाई जाणवू शकते असे म्हटले आहे. तालुका निहाय जालना ५४०, बदनापूर तीन कोटी ९३ लाख, अंबड चार कोटी १२ लाख, घनसावंगी ४ कोटी ९६ लाख, परतूर दोन कोटी ६० लाख रूपये, मंठा दोन कोटी ८७ लाख, भोकरदन ८ कोटी ७ लाख रूपये, जाफराबाद पाच कोटी ३६ लाख असे एकूण ३७ कोटी ३८ लाख रूपयांचा टंचाई आरखडा तयार केला आहे.
३८ कोटींचा टंचाई आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:06 AM