लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर व परिसरात हत्यारांचा धाक दाखवून लुटणा-या टोळीतील चार जणांना गुरूवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांकडून दोन लाख ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल तसेच लूट करण्यासाठी वापरलेले खंजीर जप्त करण्यात आले.अमित बापूराव घायाळ हे २७ जूनला रात्री जुना जालना भागातील मोती बागेजवळून मोटार सायकलवरून घरी येत असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील रोख पाच हजार रूपये तसेच मोबाईल हिसकावून घेतला होता. याचवेळी त्यांच्याकडील एटीएम कार्डही धाक दाखवून घेऊन त्याचा युजर आयडीही चोरट्यांनी जाणून घेतला. वायाळ यांनी या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यावर पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी ११ जुलैला सापळा लावून त्या प्रकरणात शेख अकीब शेख शफिक (रा. बागवान मोहल्ला जुना जालना), सैय्यद हादी सैय्यद हसन (रा. सावंगी फाटा नेर), समीर खान रेहमत खान (रा. मिल्लतनगर जुना जालना), शाहरूख खान अफसरखान (रा. रहेमानगंज जालना) यांना अटक करण्यात आली. तसेच अन्य दोन जणांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.त्यांच्याकडून गुन्हे करण्यासाठी उपयोगात आणलेली मोटारसायकल, वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल आणि खंजीर असा एकूण दोन लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोकळे यांनी सांगितले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, फौजदार हनुमंत वारे, कैलास कुरेवाड, सॅक्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, रणजित वैराळ, मंदा बनसोडे, वसंत राठोड, संदीप मांटे, विलास चेके, समाधान तेलंग्रे, विष्णू कोरडे, वैभव खोकले, सागर बाविस्कर, लखन पचलोरे, परमेश्वर धुमाळ, सूरज साठे यांची उपस्थिती होती.
जालन्यात हत्यारांचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:42 AM