जालना : तालुक्यातील दगडवाडी शिवारात अवैध मार्गाने गारगोटीसदृश दगडांचे उत्खनन सुरू असताना पोलिसांनी अचानक छापा टाकून जवळपास दहा टन गारगोटी सदृश दगड जप्त केला. याची अंदाजित किंमत चाळीस लाख रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.दगडवाडी शिवारातील आसपासच्या खेड्यांमध्ये गारगोटी सदृश दगड मोठ्या प्रमाणावर सापडतो. अनेकजण याचे उत्खनन रात्रीच्या वेळी करतात. या दगडाला बेन्टेक्सचे दागिने बनविण्यासाठी मोठी मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन या परिसरातून सर्रासपणे पोकलेन तसेच जेसीबीच्या माध्यमाने उत्खनन करण्यात येऊन जमिनीतून दगड काढला जातो. या दगडाला गुजरात, हैदराबाद, मुंंबईत मोठी मागणी असल्याने याला चांगला भाव मिळत असल्याने हा व्यवसाय या भागात तेजीत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हा गौण खनिज अधिकारी पाटील यांना बोलावण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. पोलीस आल्याचे कळताच जेसीबी तेथेच उभा करून उत्खनन करणाऱ्यांनी तेथून पळ काढण्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक योगेश गावडे, पोलीस उपनिरीक्षक गिरासे व अन्य पोलीस कर्मचा-यांचा समावेश होता.
४० लाखांचा मौल्यवान दगड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:09 AM