जालना : ४०० पार हा नरेंद्र मोदी यांचा जुमला आहे. ते २०० पारही जाणार नाहीत. महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकू म्हणणारे दर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात येत आहेत. मोदींची हवा संपल्याचा हा असर असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीचे जालना येथील उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जालना शहरातील मामा चौकात आयोजित बैठकीत ते बोलत हाेते. यावेळी प्रभाकर बकले महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाट, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, महासचिव प्रशांत कसबे, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, विजय लहाने व इतर पदाधिकारी उपस्थित होते. संविधान आम्ही बदलणार नाही, असे ते सांगत आहेत. परंतु, मोदी सत्तेत आले तर संविधान बदलणार आहेत. २०१४ ते २०२४ किती लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले हा प्रश्न विचारेपर्यंत १७ लाख नागरिकांनी देशाचे नागरिकत्व सोडल्याचा अहवाल आहे. त्यांचा धर्म हिंदू आहे. इलेक्ट्रिकल बॉण्डच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे. देश चालविण्यासाठी हे देशाची संपत्ती विकायला निघाले आहेत. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार हे एकमेकांचे नातलग आहेत. त्यामुळे कोणीही आले तरी सत्ता त्यांच्या घरात जाणार आहे. लोकशाही टिकवायची असेल तर कुटुंबशाहीला गाढा, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.
काळेंचे गुरू अशोक चव्हाणकाँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचे राजकीय गुरू अशोक चव्हाण आहेत. आज अशोक चव्हाण भाजपात असून, काळे निवडून आले तर तिकडे जाऊन बसतील. काळे, दानवे, औताडे हे एकमेकांचे नातलग आहेत. त्यामुळे इथे झालेल्या निवडणुका नावाला झाल्याची टीका प्रभाकर बकले यांनी केली.