गोदावरी आणि पूर्णा नदी काठावरील गावांना पुराचा अधिक धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस सूर्यदर्शन झाले नव्हते. यंदा गोदावरीऐवजी पूर्णा , दुधना नद्यांना पूर आले होते. यामध्ये जीवितहानी जास्त झाली नाही. केवळ एक महिला पाण्यात वाहून गेली होती. तर दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे.
पाणी साचण्याची कारणे
मोठ्या नाल्यांवरील झालेली अतिक्रमणे हे रस्त्यावर पाणी साचण्याचे मुख्य कारण आहे.
दुसरीकडे पालिकेकडून वेळोवेळी नाल्यांची सफाई होत नसल्याने देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पाणी साचल्यानंतर नाल्यांमधील कचरा साफ होत नसल्याने आरोग्य धोक्यात येत आहे.
पाऊस नको नकोसा !
जालन्यात गेल्या आठवड्यात सलग चार दिवस पावसाने हजेरी लावली होती. यामुळे खरीप हंगामातील काही ठिकाणी पिकांना दिलासा मिळाला तर काही भागांमध्ये जास्तीच्या पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. याचा परिणाम पिकाच्या वाढीवर झाल्याचे दिसून येत आहे.
- मधुकर बनगे, शेतकरी
शहरातील वर नमूद भागांमध्ये पाणी साचते. या भागात असलेल्या सांडपाण्याच्या नाल्या आणि त्यावर झालेले अतिक्रमण यामुळेही रस्त्यांना तळ्याचे रूप येते. पालिकेने यात आणखी लक्ष घालून नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून मोठे नाले अतिक्रमणमुक्त केले पाहिजेत, अशी मागणी आहे.
- बंडू पैठण, जालना
शहरातील पाणी साचणारी ठिकाणे
जालना शहरातील शनिमंदिर, टाऊन हॉल, गांधी चमन, पाणी वेस, देहेडकरवाडी, लक्कडकोट पूल यासह नूतन वसाहत, भाग्यनगर शंकरनगर, निळकंठनगर, गांधीनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. यामुळे वाहतुकीला अडथळा येऊन अनेकांच्या घरात पाणी घुसते
पालिकेचे तेच ते रडगाणे
पावसाळा सुरू झाल्यावर पाणी तुंबणे हे जालनेकरांसाठी नवीन नाही. अनेक नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे न काढल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते. यातून मार्ग काढतांना वाहनचालकांची कसरत होते.