लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील नवीन मोंढा येथील पार्श्वनाथ ट्रेडर्स दुकानात दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे केबल तोडून शनिवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारत ४५ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच रेल्वेस्थानकातून २७ लाखांची बॅग चोरी गेली होती. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री मोंढा नाका येथील दुकानात चोरट्यांनी डल्ला मारत लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरातील नवा मोंढा येथे आनंद पारसमल शिंगी (४०, रा. सावकर चौक) यांचे पार्श्वनाथ ट्रेडिंग नावाचे दुकान आहे. या दुकानात विडी, सिगारेट, व पान मसाल्याची विक्री होते. यात विविध कंपन्यांचे महागाडे सिगारेटचे बॉक्स होते. शनिवारी संध्याकाळी नेहमी प्रमाणेच आनंद सिंगी हे आपल्या दुकानाचे शटर बंद करुन घरी गेले. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडूनसह सीसीटीव्ही कॅमे-याचे केबल तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाचे दोन भाग असल्याने दुसरे शटरही चोरट्यांनी तोडून विविध कंपन्यांचे सिगारेटचे ३९ बॉक्स लंपास केले ज्याची किंमत ४५ लाख होते. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द फिर्यादी आनंद पारसमल शिंगी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४५ लाखांचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:27 AM