जालना : सीडीएम मशिनमध्ये चुकून राहिलेले ४७ हजार ५०० रुपये ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे कामगाराला परत मिळाले. ही घटना शनिवारी रात्री घडली असून, सोमवारी त्या कामगाराला बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पैसे परत देण्यात आले. विशेष म्हणजे, परत मिळालेली रक्कम ही आजारी आईच्या उपचारावरील खर्चासाठी बँकेत टाकत होतो, अशी माहिती त्या कामगाराने दिली.
शहर वाहतूक शाखेत कार्यरत पोलिस कर्मचारी नंदकिशोर टेकाळे, हवालदार भगवान बनसोडे हे झेब्रा टू मोबाइल कारने शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पीटीसी गेटच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत होते. या भागातील ॲक्सिस बँकेच्या एटीम मशिनमधून वेगळाच आवाज येत असल्याचे त्यांना ऐकू आले. त्यामुळे नंदकिशोर टेकाळे यांनी एटीम मशिनमध्ये जाऊन पाहिले असता, एटीएमच्या सीडीएम मशिनमध्ये ४७ हजार ५०० रुपये बाहेरच असल्याचे दिसून आले. त्यांनी बनसोडे यांना बोलावून घेतले व संबंधित बँकेचे व्यवस्थापक आनंद आंधेकर यांना माहिती देऊन मशिन बंद करण्याबाबत सूचित केले. घटनेची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोनि.अंबुलकर यांनाही देण्यात आली.
त्यानंतर, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना ते पैसे गीलब्रेट राज अरोकरीदास (रा.मराबादी, तामिळनाडू) यांचे असल्याचे समजले. बँक अधिकाऱ्यांनी अरोकरीदास यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर, पोलिस कर्मचारी व बँक अधिकाऱ्यांनी सोमवारी अरोकरीदास यांना बँकेत बोलावून ४७ हजार ५०० रुपये परत दिले. यावेळी बँक अधिकारी रमेश पवार, हवालदार भगवान बनसोडे, नंदकिशोर टेकाळे, किशोर नाटकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आजारी आईच्या उपचारासाठी म्हणून बँक खात्यात पैसे टाकले होते, परंतु चुकून सीडीएम मशिनमध्ये राहिलेले ते पैसे परत मिळाल्याने, त्या कामगारालाही दिलासा मिळाला होता. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.