जालना : शहराजवळील इंदेवाडी येथील सुनीता ईश्वर पांडव आणि शशिकलाबाई शंकर पांडव या मोलमजुरी करणाऱ्या सून आणि सासू यांनी प्रामाणिकपणा दाखवून सापडलेले ४९ हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग जालना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्याकडे जमा केली.
घरची परिस्थिती हलाखीची असतानाही दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस प्रशासनाने सासू - सुनेचे कौतुक केले. ३१ जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुनीता ईश्वर पांडव आणि त्यांची सासू शशिकलाबाई शंकर पांडव या दोघी इंदेवाडी परिसरातील त्यांचे नातेवाईक कृष्णा पांडव यांना भेटून घराकडे चालत जात होत्या. त्यादरम्यान, अंबड रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील एका स्पीडब्रेकरजवळ एक मेणकापडाची बॅग त्यांना सापडली होती. या बॅगमध्ये रोख ४९ हजार रुपये, चेकबुक, बँकेचे पासबुक आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. दुसऱ्या दिवशी सुनीता पांडव यांची आई आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या सासूसोबत मुंबई येथे गेल्या. त्यांनी मुंबईत पोहोचल्यानंतर तालुका जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. व्ही. अंभोरे आणि पोलीस कर्मचारी वसंत धस यांना दूरध्वनी करून आपल्याला पैशांची बॅग सापडली असून, मुंबईहून आल्यानंतर पोलीस ठाण्यात जमा करते, असे कळवले होते. काल रात्री मुंबईहून परतल्यानंतर त्यांनी तातडीने सोमवारी सकाळी तालुका जालना पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्याकडे रोख रक्कम असलेली बॅग जशास तशी जमा केली आहे.
फोटो
सापडलेली पैशांची बॅग ठाण्यात जमा करताना सासू-सून.