लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी: अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील एका राशन दुकानासमोरील ४६५० किलो गहू, तांदूळ महसूलच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली असून, ५० किलोचे ९३ कट्टे जप्त करण्यात आले आहेत.पिठोरी सिरसगाव येथील राशन दुकानासमोर गहू, तांदळाचे कट्टे ठेवण्यात आल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाली होती. अंबड येथील नायब तहसीलदार दांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी सकाळीच पिठोरी रिसगाव येथे कारवाई करून ५० किलोचे ९३ कट्टे जप्त करण्यात आले.एकूण ४६५० किलो गहू, तांदूळ या पथकाने जप्त करून अंबड येथील शासकीय गोडाऊनमध्ये नेण्यात आला.सकाळी कारवाई करण्यात आली असली तरी या प्रकरणात रात्री उशिरा राम किसन देवराव औटे (रा.बळेगाव खु) या संशयिताविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे हे करीत आहेत, अशी माहिती ठाणे अंमलदार कटुंले यांनी दिली.दरम्यान, या कारवाईच्या माहितीबाबत दांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.माहिती हवी असेल तर सकाळी कार्यालयात येऊन न्या किंवा ठाण्यात जाऊन घ्या, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, पिठोरी सिरसगाव येथील राशन दुकानासमोर माल आणला कोण आणि कसा, यासह इतर अनेक प्रश्न यानिमित्त समोर येत आहेत.
४६५० किलो गहू, तांदूळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:54 AM