जालना : औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम या स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी भीषण दुर्घटनेत तप्त लोहरस अंगावर पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला. अन्य नऊ कामगार जखमी झाले.मृत कामगार पूर्णपणे भाजल्याने त्यांची नावे रात्रीपर्यंत कळू शकली नाहीत. या कंपनीत गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान भट्ठीतील तप्त लोहरस एका बकेटमधून क्रेनव्दारे वाहून नेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यात तांत्रिक बिघाड होऊन ती बकेट क्रेनमधून तुटून खाली पडल्याने त्यातील तप्त लोहरस कंपनीत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडला. यात तीन जणांचा भाजून मृत्यू झाला. अन्य नऊ जण जखमी झाले असून त्यांना प्रथम जालन्यातील व नंतर त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य व अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी आले. मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. तेथेही पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शवविच्छेदन शुक्रवारी होईल. उपअधीक्षक सुधीर खिरडकर, चंदनझिरा ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे हे उपस्थित होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
तप्त लोहरस अंगावर पडून ३ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 12:12 AM