जालना : जालना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक यांच्या न्यायालयाने परतूर तालुक्यातील वडारवाडी येथील रहिवाशी आरोपी रामचंद्र येलप्पा धोत्रे याने मयत लिंबाजी वाघमारे यास ठार मारल्याच्या गुन्ह्यामध्ये पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. बाबासाहेब व्ही. इंगळे यांनी काम पाहिले.३१ डिसेंबर २०१५ रोजी परतूर तालुक्यातील वडारवाडी येथे फिर्यादीच्या घरासमोर आरोपी रामचंद्र हा आला व त्याने लिंबाजी वाघमारे याच्याकडे विडी मागितली. परंतु लिंबाजी यांनी विडी न दिल्याने आरोपी रामचंद्र धोत्रे यांने त्यास लाकडी दांड्याने मारहाण केली.दरम्यान, उपचार सुरु असतांना ४ जानेवारी २०१६ रोजी लिंबाजी वाघमारे यांचा मृत्यू झाला. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी विमल वाघमारे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रमा वाघमारे, वैद्यकीय अधिकारी वाय.ओ.राठोड, तपास अंमलदार सहा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व समोर आलेल्या पुराव्यावरुन आरोपी रामचंद्र धोत्रे याच्याविरुध्द भादंवि. कलम ३०४ भाग- २ अन्वये गुन्हा सिध्द झाल्यामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी आरोपीस पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
ठार मारल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:55 PM