जालना : वाढलेली बेरोजगारी, अशिक्षितपणा, श्रम न करण्याची सवय, सराईत गुन्हेगारी आदी एक ना अनेक कारणांमुळे आजची युवा पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. कारागृहात दाखल २७१ पैकी १५३ युवक हे १८ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. एकूण कैद्यांच्या तुलनेत युवक आरोपी असण्याचे प्रमाण हे ५० टक्क्यांहूनही अधिक दिसून येत आहे.
उद्योगनगरी असलेल्या जालना शहरासह जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात गत काही वर्षात चोऱ्या, दरोडे, पिस्तूलची अवैध विक्री, अवैध दारूविक्री आदी विविध गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात कोरोनामुळे कंपन्या बंद पडल्या आणि अनेकांच्या हातचे काम गेले. त्यामुळे सराईत गुन्हेगारांप्रमाणेच नवखे गुन्हेगारही विविध गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागू लागले आहेत. गत काही वर्षात पिस्तूल विक्रीचाही पर्दाफाश झाला होता. त्यात पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये युवकांची संख्या अधिक होती.
भोकरदन पोलीस व चंदनझिरा पोलिसांनी नुकताच दुचाकी चोरीतील आरोपींना जेरबंद केले आहे. यामध्येही युवकांचेच प्रमाण अधिक दिसून येत आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली जाणाऱ्या आरोपींना जिल्हा कारागृहात दाखल केले जाते. घरफोड्यांसह इतर चोऱ्यांचे प्रमाणही वाढत असून, यात युवा आरोपींची संख्या अधिक दिसून येत आहे. कारागृहात असलेल्या आरोपींपैकी काही आरोपी हे सराईत आहेत. तर काहींवर विविध गुन्ह्यात प्रथम कारागृहात जाण्याची वेळ आली आहे.
जालना येथील जिल्हा कारागृहात एकूण २७१ कैदी आहेत. त्यात पाच शिक्षाबंदी असून, इतर सर्व कच्चे कैदी आहेत. कारागृहात येणाऱ्या कच्च्या कैद्यांची प्रारंभी कोरोना तपासणी करून त्यांना कारागृहात घेतले जात आहे. कारागृहात येणाऱ्या कैद्यांसाठी वाचनालयाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. शिवाय कॅन्टीनमधील पदार्थ हे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी मनिऑर्डरने कैद्यांच्या नावे रक्कम मागवून त्यातील पैसे खर्च केले जातात.
कारागृहात येणाऱ्या कैद्यांचे समुपदेशन करण्यावर अधीक्षक अनिता गुगुटराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष भर दिला आहे. अनेकवेळा बाहेरील तज्ज्ञांना बोलावूनही विविध विषयावर माहिती दिली जाते. कैद्यांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून लहान-सहान व्यावसाय करून जीवन जगावे याबाबतही समुपदेशन केले जाते. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे.
पॅरोलवरील दोन कैदी बाहेर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात येत होते. त्यानुसार सध्या कारागृहातील दोन कैद्यांना पॅरोलवर ४५ दिवसांसाठी सोडण्यात आले आहे. पॅरोलवर कैद्याला बाहेर सोडताना विविध अटी घालून त्याला सोडले जात असल्याचे सांगण्यात आले.
बलात्कारातील गुन्ह्याचे प्रमाण जास्त
महिला अत्याचाराच्या प्रकरणातही अनेक आरोपी या कारागृहात आहेत. विनयभंग, अत्याचाराच्या प्रकरणात येणाऱ्या युवकांचे प्रमाणही गत काही वर्षात वाढले आहे. दाखल तक्रारींचे प्रमाण गत काही वर्षात सरासरी सारखेच असल्याचे सांगण्यात येते.
महिला कैद्यांच्या संख्येत वाढ
कारागृहात येणाऱ्या महिला आरोपींची संख्या तीन वर्षांपूर्वी कमी होती. मात्र, गत तीन वर्षापासून महिला आरोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या या कारागृहात २० महिला आरोपी असून, त्यातील १३ जणी गंभीर गुन्ह्यात आहेत.
पैशांसाठी काहीही करण्यास तयार...
पैसे मिळावे म्हणून शहर व परिसरातील अनेक युवक दुचाकींची चोरी करीत आहेत. अटक आरोपींमध्ये युवकांची संख्या अधिक आहे.
अनेक युवक घरफोडी, दुकानफोडीतही सक्रिय झाले आहेत. घरफोडीत पकडण्यात आलेल्या आरोपींमध्येही युवकांचीच संख्या अधिक आहे.
महिलांना विशेषत: वृद्ध महिलांना टार्गेट करून दागिने, पैसे लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक युवक विना नंबरची दुचाकी वापरून महिलांचे दागिने लुटतात .