गेल्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढत असल्याने जालनेकरांची चिंता आणखी वाढली आहे. रुग्ण गंभीर होण्याच्या प्रकारामुळे दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवून ऑक्सिजन देण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. व्हेंटिलेटरप्रमाणेच ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर हे यंत्रही महत्त्वाचे ठरत आहे. या यंत्राद्वारे हवेतून ऑक्सिजन घेऊन तो थेट रुग्णांना दिला जात आहे. व्हेंटिलेटरची संख्या मर्यादित असली तरी ते व्हेंटिलेटर सुस्थितीत असून, रुग्णांना दिलासा देत आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढल्याने सरकारने उद्योगासाठीचा ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो सर्व पुरवठा केवळ रुग्णालयांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजनअभावी आजघडीला जिल्ह्यात रुग्णांना अडचण नसल्याचे दिसून आले. गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्याला केंद्र आणि राज्य सरकार तसेच उद्योगांच्या सीएसआर निधीमधून जवळपास शंभरपेक्षा अधिक ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मिळाले आहेत. जालना ४५, अंबड ४५, कोविड रुग्णालय ४०, राजूर १०, परतूर, मंठा प्रत्येकी १० असे त्या ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरचे वितरण करण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर सांगण्यात आले. ही यंत्रे मिळाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोविड रुग्णालय
जालना येथील कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा असलेले ४० बेड आहेत. तेथे सर्व व्हेंटिलेटर सुरू असल्याचे भेट दिली असता दिसून आले.
अपुरे व्हेंटिलेटर
तालुका पातळीवर केवळ ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी दोन व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्यामुळे ही संख्या आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे असे तेथील रुग्णस्थितीवरून दिसून आले.
कॉन्सेट्रेटरने दिलासा
जिल्ह्यातील जालन्यासह आठही ग्रामीण रुग्णालयांत ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर वितरित करण्यात आल्याने कोरोना रुग्णांना मोठी मदत झाल्याचे दिसून आले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सुरुवातीपासून ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे नियोजन केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
- अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक