गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. एकूणच जालना जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या निवडणुकीत वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून अनेकवेळा स्वपक्षाचेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे असतात. या निवडणुका पक्ष पातळीवर गंभीरतेने घेतल्या जातात. कुठल्या पक्षाच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे. त्यानुसार तो राजकीय पक्ष ग्रामीण भागात रूजला आहे की, नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे मोठ्या नेत्यांपासून ते अत्यंत लहान कार्यकर्त्यालादेखील लक्ष घालावे लागते. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. प्रत्यक्ष या निवडणुकांची मुदत ही नोव्हेंबरमध्येच संपली आहे. या निवडणुकीत पॅनलच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद असते. त्यामुळे अनेक युवक या निवडणुकीत आपले भविष्य आजमावत आहेत. बुधवारी ऑनलाईन प्रमाणेच ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. यामुळे तहसील कार्यालयांना जत्रेचे स्वरूप आले होते.
१५ जानेवारी रोजी फैसला
निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, आता अर्ज छाननीकडे लक्ष लागले आहे. क्षुल्लक कारणामुळे उमेदवारी अर्ज बाद झाल्यास मोठी अडचण येते. त्यामुळे अर्ज भरताना मोठी काळजी घेतली जाते. या निवडणुकांसाठी मतमोजणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.