फकिरा देशमुख
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ९० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्यातील ६२ हजार १५० पशुधनाचे आरोग्य वाऱ्यावर आहे.
जनावरे, प्राणी, पक्षांना वेळेवर व कमी पैशात उपचार मिळावे, यासाठी जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या वतीने तालुक्यात ठिकठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले आहेत. या दवाखान्यांमार्फत शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचार केले जातात. परंतु, पशुसंवर्धन विभागात ९० टक्के पदे रिक्त असल्याने पशुधनाचे आरोग्य वाऱ्यावर दिसत आहे. जिल्हा परिषदेतर्फे पशुधन विकास अधिकारी व सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची ११ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ चार पदे भरलेले असून, तब्बल ८ पदे रिक्त आहेत. पारध, जवखेडा, हसनाबाद, आणवा, नळणी तर राज्य शासनाच्या आव्हाना, सिपोरा बजार, दानापूर, वालसावंगी, धावडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या ठिकाणचा कारभार केवळ तीन पशुधन विकास अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. भोकरदन तालुक्यात २०१२ च्या जनगणनेनुसार १९०५८ गायी, ४०५० म्हशी, २२७०९ मेंढ्या तर १५६३३ कोंबड्या आहेत. या पशुधनावर उपचार करण्यासाठी केवळ चार पशुधन अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन घेऊन खासगी रूग्णालयात जावे लागत आहे.
एकाच अधिकाऱ्याकडे तीन तालुक्यांचा पदभार
जालना येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. असरार यांच्याकडे जालना, बदनापूर व भोकरदन तालुक्याचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
भोकरदन तालुक्यात आमच्या विभागातील १२ पदे रिक्त आहेत. शिवाय एकही कर्मचारी नाही. एकाच अधिकाऱ्यावर तीन तालुक्यांचा कारभार देण्यात आला आहे. शिवाय, पशुधन विकास अधिकारी रोहिणी साळवे यांना सुध्दा जालना येथील पदभार देण्यात आला. भोकरदन तालुक्यातील रिक्त पदांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
डी.के. जंजाळ, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग