जालना : महिलांना एसटी प्रवासातील तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शुक्रवारपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पहिल्याच दिवशी जवळपास ७३० महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्याच्या वर्ष २०२३-२४च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती.
तसेच ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. दरम्यान, महिला सन्मान योजनेचा पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ७३० महिलांनी लाभ घेतल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली.