जालना : कुठलाही ट्रेडमार्क तसेच सिगारेट आरोग्यास हानिकारक असा वैधानिक इशारा नसलेले ७४ हजार १०० रुपये किमतीचे सिगारेट गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. नवीन मोंढ्यात शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.मुंबई येथील व्हिकेअर सामाजिक संस्थांचे सभासद अखिलेश मुख्यनाथ पांडे व संजय अरविंद बचानी यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना माहिती दिली होती. गौर यांनी माहितीची खात्री करून गुन्हे शाखेच्या एका पथकाला नवीन मोंढ्यात पाठविले. नवीन मोंढ्यातील सुदर्शन कॉर्पोरेशन या दुकानात सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी व पोलिसांनी केलेल्या तपासणीत कुठलाही वैधानिक इशारा व ट्रेडमार्क नसलेली सिगारेटची पाकिटे सापडली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित राजेश ओमप्रकाश राठी यांच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, संतोष सावंत, सॅम्युअल कांबळे, रंजित वैराळ, समाधान तेलंग्रे, सचिन चौधरी, विलास चेके, सतीश गोफणे, सागर बाविस्कर, शिवदास एखंडे यांनी ही कारवाई केली.
७४ हजारांच्या बनावट सिगारेट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:43 AM