लोकमत न्यूज नेटवर्कजालना/अंबड : वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोहिलागड (ता.अंबड) येथील मंडळाधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. विष्णू भगवानराव जायभाये (४८ रा. उस्मानपुरा, औरंगाबाद) असे लाच स्वीकारणा-या मंडळाधिका-याचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा हायवा न पकडण्यासाठी, तसेच नियमित वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मंडळाधिकारी जायभाये याने दहा हजारांची लाच मागितली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अंबड तालुक्यातील दूनगाव फाटा येथे पंचासमक्ष जावून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. सोमवारी सकाळी औरंगाबाद-बीड हायवेवरील झोडेगाव फाटा येथे सापळा लावून मंडळाधिकारी जायभाये यास तक्रादाराकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद, व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, अमोल आगलावे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.
वाळू वाहतुकीसाठी ८ हजारांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:05 AM