लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार ४५५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर १८ हजार ३९२ कर्जखात्यांमध्ये तब्बल ८४ कोटी ९९ लाख ८५ हजार ६१४ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित खातेधारक शेतक-याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी झाला आहे.महाआघाडी शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर प्रारंभी दोन लाख रूपयाच्या आत कर्ज असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँकेतील कर्ज खात्याशी संलग्न करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने राबविली. त्यानंतर शासकीय वेबसाईटवर १ लाख ८१ हजार ५६७ शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक टप्प्यात शासनाकडून यादी जाहीर करण्यात आली. यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ शेतक-यांचा समावेश होता. आलेल्या २९ फेब्रुवारी रोजी आलेल्या दुस-या यादीत जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.शासनाने जाहीर केलेल्या दोन्ही याद्यांमधील १ लाख ३० हजार १५८ शेतक-यांपैकी ८३ हजार ६४८ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करून कर्जमाफीला मान्यता दिली आहे. तसेच आजवर १८ हजार ३९२ कर्जखात्यावर ४४ कोटी ९९ लाख ८५ हजार ६१४ रूपये शासनाकडून वर्ग करण्यात आले आहेत. यात राष्ट्रीयकृत बँकेच्या ६९४० खात्यावर ५७ कोटी २७ लाख ४६ हजार ९५६ रूपये तर जिल्हा बँकेतील ११ हजार ४५२ कर्ज खात्यावर २७ कोटी ७२ लाख ३८ हजार ६५८ रूपये वर्ग झाले आहेत.दरम्यान, आधार प्रमाणिकरण वेळेत व्हावे, लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्यासह सर्वच संबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.शेतक-याने वाटले पेढे : भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक शेतकरीकर्जमुक्ती यादीत नाव आल्यानंतर परतूर तालुक्यातील दैठणा (बु.) येथील शेतकरी अंकुश केशव गायके यांनी आधार प्रमाणीकरण केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित शेतक-यांसह नागरिकांना पेढे वाटून कर्जमुक्तीचा आनंद साजरा करून महाआघाडी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
१८,३९२ खात्यात ८५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:28 AM